Devendra Fadnavis : “खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर त्याचा भांडाफोड केला.” असा मोठा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमधून माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले, आम्हाला कल्पना होती, की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळं महिला एकदम पुढे येत नाहीत. ज्यामुळं जे पीडित आहेत त्यांना धीर देऊन, त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात काही महिला प्रतिसादही देत आहेत” अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर तपासणी आणि कारवाई सुरू असून, डीजी यामध्ये लक्ष घालत असून, नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करताहेत, असे म्हणत जर कोणाकडे या संदर्भात काही पुरावा असेल तर निश्चित आणून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत फडणवीसांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खरातकडे अनेक लोकं जायचे, विरोधी पक्षाचे कोणकोण गेलेत त्याचे पुरावे देऊ शकतो. आपल्याकडे या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे आहेत. पण, हे पोलिसांच्या हाती असून मुळात हे पोलिसांचं काम असल्याचे सांगत या प्रकरणी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई सुरू असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हेही वाचा : Rohit Pawar: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी? रोहित पवारांनी सुनेत्राकाकींना सांगितली ‘या’ ४ महिलांची नावे या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. आपल्या कथित शक्तींचा वापर करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पोलीस शक्य त्या सर्व गोष्टी करतील असे म्हणत पोलीस कारवाईकडे त्यांनी लक्ष वेधले. फडणवीसांनी ठणकावले अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जात आहेत. पण राजकीय व्यक्तींचे फोटो कोणसोबतही असू शकतात. ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन खरातसाठी 40 किलोमीटरची पाण्याची लाईन मंजूर केली, त्यांना काय शिक्षा द्यावी? मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे या मुद्द्यावर शांत का बसतात? आम्हाला या सगळ्याचे राजकारण करायचे नाही. महिलांची प्रतिष्ठा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. हेही वाचा : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद ; पवन कुमार चामलिंग यांना टाकले मागे