Kushal badarike : आपल्याला लहान मूल होता आलं पाहिजे! अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

बालपण. हे दोनच शब्द पण तितकेच महत्वाचे. या वयातील मुलांना चांगलं वाईट याची कसलीही समज नसते. यामुळे या वयात त्यांच्यावर जसे संस्कार होतात तसेच ते पुढे घडत जातात. प्रत्येक जण वयाने मोठा झाल्यावर बालपणीच्या आठवणीत रमत असतोच आणि पुन्हा त्याला लहान व्हावं असं वाटत असतं, पण ते आता शक्य नाही. असं जरी असल तरी लहान मुलांसोबत ही मंडळी रमतात…त्यांच्यासोबत वेळ घालवत असतात. असंच काहीसं विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेने केले आहे. त्याच्या मुलांची पोस्ट त्याने इन्स्टावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कुशलने आपल्याला ही लहान मुलं होता आलं पाहिजे असं म्हटलं आहे.
नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक मुलगा खिडकीत गिटार वाजवताना दिसत आहे, तर दुसरा मुलगा त्याच्या बाजूला चित्र काढत बसला आहे. यावेळी सूर्य हा मावळतिला आला आहे. या फोटोच्या खाली कुशलने कॅप्शनमध्ये आपल्याला लहान मुलं होता आलं पाहिजे असं म्हटलं आहे. यामुळे त्याने केलेली ही पोस्ट चर्चेत आहे.
घरी मेस्सी, रोनाल्डो व स्पायडरमॅन पडीक
मुलांमुळे घरी मेस्सी, रोनाल्डो व स्पायडरमॅन त्याच्या घरी पडीक असतात, असे म्हटले आहे. “ही माझी मुलं…. यांना कधीही… काहीही… होता येतं. आज एक जण ‘रॉकस्टार’ झालाय; तर एकजण ‘पेंटर’ झाला आहे. तसे हे दोघं रोज कोण ना कोण होत असतात. त्यांच्यामुळे ते मेस्सी, रोनाल्डो, स्पायडरमॅन, पुष्पा… पुष्पराज वगैरे मंडळी तर माझ्या घरी पडीक असतात, असं कुशलने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
…ही लक्ष्मणरेषेपेक्षा डेंजर
तुम्हाला सांगू… आपल्या सगळ्यांच्या जगापल्याड या मुलांची एक दुनिया आहे. ‘अतर्काची दुनिया’, ज्यात काळ-वेळेचं गणित नाही की अनावश्यक लॉजिक नाहीत. जिथे ‘सॉरी’ म्हटलं की, विषय संपतो. ‘कट्टी’पासून सुरू झालेली लढाई, ‘बट्टी’ म्हटलं की संपते आणि मैत्री आधीपेक्षा घट्ट होते. आईरक्ताची शपथ ही लक्ष्मणरेषेपेक्षा डेंजर असते, ती कधीच ओलांडता येत नाही. मला एवढंच वाटतं की, आज लहानपणी त्यांना वाट्टेल ते होता येतंय, मोठे झाल्यावर ते कोण होतील माहीत नाही; पण त्यांना ‘लहान मूल’ होता आलं पाहिजे. बास…! सुकून. अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिली आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.





