Eknath Shinde – विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेचे नाव सातत्याने पुढे रेटण्यात येत होते. त्यातच एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांपासून दूर असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात असताना. अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर आमच्यात कुठलीच नाराजी नसल्याचे स्पष्ट करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले. भाजपाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने ते मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी राजीनामा राज्यपालांकडे सादर केला होता. त्यानंतर मात्र राज्यभरातून शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी लावून धारली होती. त्यामुळे आपसूकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी २०१९ ची पुनरावृत्ती होते की काय अशा वल्गना देखील सुरु झाल्या असताना, बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेताना, महायुतीचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचे जाहीर केले. शिंदे म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढलो असून आमच्यात कुठलीही नाराजी नाही. महायुती मजबूत असून जनतेने जो जनादेश दिला तो लक्षात घेऊन आता आणखी खूप काम करायचंय, नापी है थोडी जमीन… अभी पुरा आसमान बाकी है.. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली असल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे पाठबळ शिंदे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातल्यानेच महायुतीला यश मिळाल्याचे सांगितले. या विजयात सर्वांचेच पाठबळ मिळाले त्यामुळेच आम्ही चांगले काम करू शकलो. या अडीच वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सातत्याने पाठबळ दिल्याचे सांगताना आम्ही घेतलेले निर्णय हे क्रान्तिकारक असल्याचे देखील ते म्हणाले. मी आजही कार्यकर्ता आणि उद्याही सर्व सामान्य लोकांसाठी मी काम करतो. गरीब कुटुंबाच्या वेदना मला समजतात, त्यामुळेच त्यांचा डोळ्यासमोर ठेवून मी काम करत राहिलो. मुख्यमंत्री असून देखील लोकांशी संवाद साधण्यात कधीच आडकाठी आली नाही. कारण मी काल देखील कार्यकर्ता होतो, आज देखील आहे आणि उद्याही कार्यकर्ताच असणार आहे, असे बोलताना शिंदे म्हणाले. उद्या महायुतीची बैठक उद्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीतील तीनही पक्षांची दिल्लीत बैठक होणार असून, या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे सर्व काही ठरेल, असे म्हणताना एकनाथ शिंदे यांनी चेंडू उद्याच्या बैठकीपर्यंत टोलवीला. त्यामुळे मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार आहे, हे गुलदस्त्यातच असणार आहे.