Narendra Modi – भाजप-एनडीए सरकारने देशात सुशासनचे एक नवीन मॉडेल दिले आहे. आम्ही विकास भी, विरासत भी या मंत्राने पुढे जात आहोत. देशाच्या आणि लोकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले. तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढाई देत आम्ही देशाला घोटाळ्यांपासून मुक्त केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुधारित जीएसटीचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले. नरेंद्र मोदी म्हणाले, भाजप सत्तेसाठी नव्हे, तर जनतेला सेवा देण्यासाठी सरकारमध्ये आहे आणि भाजप कार्यालये ही भावना जिवंत ठेवतात. तसेच आमच्या सरकारने सामान्य लोकांच्या बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. २०१४ मध्ये जेव्हा यूपीए सरकार सत्तेत होते तेव्हा २ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर असायचा. आता १२ लाखांच्या उत्पन्नावरही शून्य कर आहे. जीएसटीच्या बाबतीतही असेच होते. २०१४ पूर्वी जर एका सामान्य कुटुंबाने एका वर्षात आपल्या दैनंदिन गरजांवर १ लाख रुपये खर्च केले तर त्याला सुमारे २५,००० रुपये कर भरावा लागत असे. आता जीएसटी सुधारणांनंतर त्या कुटुंबाला फक्त ५,०००-६,००० रुपये कर भरावा लागत आहे. २०१४ च्या तुलनेत २०,००० रुपयांची बचत होत आहे. जर आपण आयकर आणि जीएसटी बचतीचा समावेश केला तर दरवर्षी लोक २.५ लाख कोटी रुपये वाचवू शकतील, असेही मोदी म्हणाले.