कोल्हापूर – विधानसभा निवडणुकीत आम्हाला 72 लाख मतं आहेत. मात्र, आमचे फक्त उमेदवार 10 निवडून आले. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला 58 लाख मत आहेत, तरीही त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 15, तर 79 लाख मत मिळालेल्या पक्षाचे 57 आमदार निवडून येतात. आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र, मतांची आकडेवारी आश्चर्यकारक आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
कोल्हापुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, गेल्या काही काळात चार निवडणुका पार पडल्या आहेत. हरियाणामध्ये मी स्वत: गेलो होतो. तिथं भाजपची अवस्था अतिशय कठिण होती, पण तिथे भाजप सत्तेवर आली. काश्मीरमध्ये निवडणूक झाली. तिथे फारुक अब्दुल्ला यांचा पक्ष आला. महाराष्ट्राची निवडणूक झाली. येथे भाजपला यश आले. मात्र, झारखंडमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की, एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात, एका निवडणुकीत आम्ही जिंकलो. ईव्हीएमचा काही संबंध नाही. मोठी राज्य आहेत, तिथे भाजप आहे, आणि छोटी राज्यं आहेत, तिथं अनेक पक्ष आहेत.
विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होते, पण निकाल अनुकूल लागला नाही. तसेच आता निवडणूक प्रक्रिया संपली आहे. मारकडवाडी येथे बंदी घालण्याचे कारण काय? त्या गावातील लोकांना पाहायचे होते की मतं कुणाला किती पडली. त्यामुळे आम्ही आता ठरवले आहे की त्या गावातील लोकांचे काय म्हणणे आहे. आम्ही एकत्रपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. पण उगीच आरोप करणं योग्य नाही. कारण माझ्याकडे पुरावा नाही. प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मतं किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. काँग्रेसला राज्यात 80 लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना 79 लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. शरद पवार गटाचे 72 लाख मते आहेत. आमचे उमेदवार निवडून आले 10. अजित पवार गटाचे 58 लाख मते आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले 41. 72 लाखांचे 10 आणि 58 लाखवाल्यांचे 41. हे काही तरी आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.