“…त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला असे आम्ही मानत नाही,”; जयंत पाटील यांचे विधान

Dhananjay Munde | राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात आता पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहिती असते, हे मी अनेक ठिकाणी ऐकले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती असल्याचे जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना म्हंटले आहे.
तर काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. याबाबत बोलाताना जयंत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहात माहिती देणे अपेक्षित होते. राजीनामा देऊन पाच दिवस झाले आणि अजूनही ते त्यावर बोलले नाहीत. त्यामुळे हा राजीनामा झाला असे आम्ही मानत नाही.”
येत्या काळात जर या प्रकरणात पोलिसांना धागेदोरे सापडले तर ते धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू शकतात. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर काही तासांतच धनंजय मुंडे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगून तो राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा:





