वैद्यकीय महाविद्यालयाशी आमचा संबंध नाही; अधिष्ठाताच्या लाचखोरीनंतर महापालिका प्रशासनाची भूमिका

पुणे -“भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय महापालिकेचे असले, तरी त्याच्या संचलनासाठी महापालिकेने ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टकडून वैद्यकीय प्रवेशाचे सर्व अधिकार अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना देण्यात होते. महापालिका केवळ महाविद्यालयासाठी पायाभूत सुविधा देण्यापर्यंत मर्यादित आहे. प्रवेश प्रक्रियेत महापालिकेचा कोणताही संबध नाही,’ असा खुलासा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी केला.
बंगिनवार यास 10 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर महापालिकेने हा सावध पवित्र घेतला आहे. यातून प्रशासनाने हात झटकल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. तर, ट्रस्टने गेल्या दोन वर्षांत कोणताही अथवा निर्णय महापालिकेस कळवला नसल्याचा खुलासाही डॉ. बिनवडे यांनी केला आहे.
दरम्यान, पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या माध्यमातून हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले आहे. या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष हे महापौर असतील. यासह यामध्ये सर्वपक्षीय नेते, अधिकारी असे एकूण 20 सदस्य होते. पण महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने लोकनियुक्त सदस्य या ट्रस्टमधून बाहेर असून महापालिका आयुक्त हे ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तर, महाविद्यालयाच्या कामात अडचणी येऊ नयेत, तसेच निर्णयप्रक्रिया रखडू नये, यासाठी ट्रस्टने बंगिनवार यांना सर्वाधिकार दिले होते, असे बिनवडे यांनी स्पष्ट केले. “आम्ही केवळ पायाभूत सुविधा पुरवितो. बाकी सर्व निर्णय अधिष्ठाताच घेत होते. त्याचा एकाही कागद महापालिकेला दिला जात नाही,’ असा खुलासा डॉ. बिनवडे यांनी केला आहे.
व्यवस्थापन कोट्यातून भरल्या 22 जागा
दरम्यान, लाचखोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर शिवसेनेने (ठाकरे गट) डॉ. रवींद्र बिनवडे यांची भेट घेत या महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून भरलेल्या जागांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी या कोट्यातून 15 ऐवजी 29 जागांवर प्रवेश दिला, तर या वर्षीही व्यवस्थापन कोटा पंधराचा असताना 22 जागा व्यवस्थापान कोट्यातून भरल्याचा दावा माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांनी केला आहे. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तर, या प्रकरणी अधिष्ठातांसह सर्व विश्वस्तांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम आदमी पक्षाचे डॉ. अभिजित मोरे यांनी केली आहे.
हे आहेत वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यमान ट्रस्टी
- महापालिका आयुक्त
- अतिरिक्त आयुक्त
- उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
- आरोग्य प्रमुख
- अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय
- मुख्य लेखापाल
- शहर अभियंता
- उपायुक्त, मालमत्ता व व्यवस्थापन
- विधी सल्लागार
- वैद्यकीय अधीक्षक, महाविद्यालय





