चर्चेच्या नव्या फेरीविषयी शेतकरी नेत्यांशी बोलणी सुरू – तोमर

नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संबंधात केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी पुन्हा बोलणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या नेत्यांशी चर्चेची फेरी पुन्हा कधी करता येईल या विषयी बोलणी सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांशी पुन्हा नक्की चर्चा सुरू होईल त्यासाठी आमचा त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास कधीही तयार आहोत. त्यांना कधी चर्चा हवी आहे ते त्यांनी सरकारला कळवावे असे त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या चाळीस संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर या आधी सरकारच्या चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. पण त्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील चर्चेची ही प्रक्रिया थांबलेली आहे. आज सकाळी तोमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या पेचप्रसंगावर चर्चा केली.





