फटाके न फोडून आपण स्वत:वरच उपकार करतो आहोत; केजरीवाल यांनी मांडली भूमिका

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिल्लीतील 64,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करतानाच दिल्ली-एनसीआरमधील फटाके बंदीवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत फटाक्यांच्या बंदीबाबत विचारले असता ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय सर्वांनीच दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, आनंदाचा सण आहे, फटाक्यांचा नाही असे म्हटले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रदूषण पाहता दिवे, मेणबत्त्या पेटवून आपला सण साजरा केला पाहिजे. फटाके जाळू नयेत, त्यामुळे प्रदूषण होते. फटाके न फोडल्याने आम्ही कोणावर उपकार करत आहोत असे नाही. आम्ही स्वतःवर उपकार करत आहोत अशी टिप्पणी त्यांनी केली.
प्रदूषण असेल तर त्याचा त्रास आपल्यालाही होईल, आपल्या लहान मुलांना त्रास होईल. यात हिंदू-मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माचा प्रश्न नाही, प्रत्येकाचा श्वास महत्त्वाचा आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दिवाळीत फटाक्यांच्या बंदीच्या संदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांनी फटाके बंदीला दुर्दैवी ठरवून याला हिंदू सणांवर हल्ला आणि षडयंत्र म्हटले आहे.
बकरी ईदवर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही, असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की सनातन धर्माचे सण आले की, कायद्याचे उल्लंघन होत असल्याची चर्चा सुरू होते.अनेक जण असेही म्हणतात की सणात इतके तेलाचे दिवे पेटवले जातात, त्यात किती गरिबांना फायदा झाला असता असे सांगितले जाते.
मात्र दिवाळीच्या वेळी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, या देशात बकरी ईदही साजरी केली जाते, त्यांनी ती थांबवावी. बकरीईदच्या वेळी लाखो बकऱ्यांची कत्तल केली जाते, त्याऐवजी ते पैसे गरिबांमध्ये वाटले जावेत, त्यामुळे प्राण्यांवर हिंसाही होणार नाही.




