होळी खेळताना पाण्यापासून फोन कसा ठेवाल सुरक्षित? डिव्हाइसच्या सुरक्षेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Smartphone Safety Tips | होळी हा मौजमजेचा आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी रंगांची उधळण केली जाते. मित्र-मैत्रिणींसोबत मिळून आनंदाने हा सण साजरा केला जातो. मात्र, होळी खेळताना स्मार्टफोनची काळजी न घेतल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. तुमचा महागडा स्मार्टफोन पाणी आणि रंगामुळे खराब होण्याची शक्यता आहे. तुमच्या फोनला रंग आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
वॉटरप्रूफ पाऊचचा करा वापर
होळी खेळायला जाताना तुम्ही स्मार्टफोनसाठी वॉटरप्रूफ पाऊचचा वापर करू शकता. वॉटरप्रूफ पाऊचमुळे तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहील. बाजारात कमी किंमतीत येणारे वॉटरप्रूफ पाऊच उपलब्ध आहे. हे पाऊच तुमच्या फोनमध्ये पाणी किंवा रंग जाण्यापासून रोखू शकतात.
प्लास्टिक वापरा
तुमच्याकडे वॉटरप्रूफ पाऊच नसल्यास प्लास्टिकचा देखील वापर करू शकता. फोनला प्लास्टिकमध्ये ठेऊन आनंदाने रंग खेळू शकता. वॉटरप्रूफ पाऊचप्रमाणेच प्लास्टिक देखील सहज तुमच्या फोनला सुरक्षित ठेवेल.
तसेच, होळी खेळताना फोन सुरक्षित राहण्यासाठी आधीच खबरदारी घ्यायला हवी. शक्य असल्यास होळी खेळताना फोन स्वतः जवळ बाळगू नका. याशिवाय, तुम्ही फोनवर बोलण्यासाठी इयरबड्सचाही वापर करू शकता.
फोनमध्ये पाणी गेल्यास काय कराल?
कितीही काळजी घेतली तरीही होळी खेळताना फोनमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. फोनमध्ये पाणी गेल्यास डिव्हाइसचा वापर करणे टाळावे. फोनला चालू-बंद करण्याचा प्रयत्न करू नये. पाणी गेल्यास त्वरित कोरड्या मऊ कापडाने फोनला पुसा व उन्हात ठेवा.
भिजलेल्या फोनला चार्ज करण्याचाही प्रयत्न करू नका. असे केल्यास शॉर्ट सर्किट होण्याची भिती असते. फोन वाळण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर करणे टाळावे. तसेच, फोनमध्ये जास्त पाणी गेल्यास त्वरित सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवावे.





