प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत रविवारी (दि. २३) सुमारे ३८ हजार ३४० जणांनी मतदान करण्याची शपथ घेतली. मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकाला मानवंदना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, डब्ल्यूटीई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर सायक्लोथॉन २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांमध्ये मतदानाबाबत जागृतीसाठी मतदान शपथ देण्याचा विशेष उपक्रम महापालिकेने आयोजित केला होता. यावेळी आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, ” अशी शपथ उपस्थितांनी घेतली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले. “राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत स्वीप व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.” – श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा प्रशासक