पुणे जिल्हा | भोरला उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

भोर, (प्रतिनिधी) – भोर शहराला भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे सोमवार (ता. १३) पासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशा आशयाचे निवेदन नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले असून शहरातून दवंडी पिटविण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी दिली.
भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला भोर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. धरणाच्या भिंतीपासून चारी खोदून विहिरीत पाणी घेतलेले आहे. मात्र, धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे चारीतून हव्या त्या प्रमाणात पाणी विहिरीत येत नाही.
शिवाय धरणावरील वीजनिर्मिती केंद्रही बंद आहे. त्यामुळे विहिरीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भोर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमता असलेल्या दोन मोटारी आहेत.
मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फक्त ६० एचपीची मोटारच सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भोर शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. भोरवासीयांना चांगले स्वच्छ पाणी मिळावे यासाठी दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.





