Bhor : दुष्काळाच्या छायेतही भोर शहरात पाण्याची नासाडी
Bhor : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत, तर भरलेले साठे वाढत्या तापमानामुळे आटत आहेत. भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार टक्के पाणीसाठा कमी आहे.

महुडे : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना, भोर शहरात मात्र घरगुती पाणीपुरवठ्याच्या वेळेत रस्त्यावरून पाणी खळखळून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाहेर दुष्काळ आणि शहरात पाण्याचा धो-धो अपव्यय अशी विरोधाभासी स्थिती निर्माण झाली असून, या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत, तर भरलेले साठे वाढत्या तापमानामुळे आटत आहेत. भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पाणी जपून वापरा असे आवाहन केले जात असले, तरी प्रत्यक्ष पाण्याचा अपव्यय रोखण्यात अपयश येत आहे.
केवळ पाणी बचतीचे आवाहन करण्यापलीकडे नगरपालिका प्रशासनाकडून गळती रोखण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. दुष्काळी परिस्थितीतही पाणी नियोजनाबाबत पालिका प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गळक्या नळांमुळे हजारो लिटर पाणी वाया
भोर नगरपालिकेच्या वतीने शहराला दररोज सकाळी पाणीपुरवठा केला जातो. शहरात सध्या कुठे कमी दाबाने, कुठे उच्च दाबाने, तर काही भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशा संमिश्र परिस्थितीत अनेक घरांसमोरील तुटके आणि गळके नळ दुरुस्त न केल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत हजारो लिटर पाणी थेट रस्त्यावर वाहून जात आहे.





