राजगुरूनगर : पुणे रिंगरोड प्रकल्पातील ब्लास्टिंगचे दुष्परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागले असून, निघोजे परिसरासह इंद्रायणी नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. डिसेंबर महिन्यातच विहिरी कोरड्या पडणे आणि कूपनलिकांचा जलप्रवाह थांबणे ही चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही पाणी उपलब्ध न राहिल्याने नागरिक, शेतकरी आणि महिला प्रचंड त्रस्त झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रिंगरोडच्या कामाजवळ गेल्या काही आठवड्यांपासून हेवी ब्लास्टिंग सुरू आहे. या स्फोटांच्या कंपनांमुळे भूपृष्ठाखालील जलवाहिन्यांची दिशा बदलल्याचा किंवा त्या तुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वर्षानुवर्षे पाणी असलेले जलस्रोत काही दिवसांतच कोरडे पडले आहेत. निघोजे, पिंपळगाव बुद्रुक, शिंदे वस्ती, काळाखेल व इंद्रायणी नदीकाठच्या वाड्यांमधील विहिरी कोरड्या झाल्या असून, कूपनलिका बंद पडल्याने पीक सिंचन नियोजन बिघडले आहे. रिंगरोड प्रकल्पामुळे विकासाची अपेक्षा असली तरी ग्रामस्थांचा जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ब्लास्टिंगमुळे भूजलस्तरात एवढा मोठा बदल होत असेल तर त्यावर तातडीने वैज्ञानिक व प्रशासकीय तपासणी होणे गरजेचे असल्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. आमचे पाणी कोण देणार? पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, ग्रामसभांमध्येही हा विषय जोरदार चर्चेत आहे. पाण्याचा स्रोतच नष्ट झाला तर जगणे अवघड होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सरकारने व प्रशासनाने लक्ष दिले नाही तर पुढील काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाकडे तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत. पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. तसेच, रिंगरोड ब्लास्टिंगचा वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा, विहिरी व कूपनलिकांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करावा आणि प्रकल्पग्रस्त गावांना शाश्वत पर्यायी पाणीपुरवठा योजना द्यावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत. उन्हाळा कसा जाणार? निघोजे परिसर नेहमी डिसेंबरपर्यंत मुबलक जलसाठा राखून असतो. मात्र, यंदा हिवाळ्यातच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पुढील दोन-तीन महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक धोक्यात येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.