Water Scarcity – शहरातील इंद्रायणी कॉलनी परिसरात मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. घरगुती कामे, स्वयंपाक, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मोठ्या निधीतून उभारलेली योजना प्रत्यक्षात नागरिकांना वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी पाणीटंचाईविरोधात अनेक वेळा हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोर्च्यानंतरही कोणताही ठोस निर्णय किंवा उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी अधिकच वाढली आहे. नव्याने उभारण्यात आलेली पाण्याची टाकी सुरू होण्यापूर्वीच गळतीला लागल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे टाकीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असून, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींचा खर्च करूनही दर्जाहीन काम झाले आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, दोषींवर चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे. “पाण्याच्या टाकीचे काम सुरू असल्यामुळे सध्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. जलजीवन मिशन संदर्भातील फाईल सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही. दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.” – धनंजय देशमुख, ग्रामविकास अधिकारी