एक दिवस कपात, दोन दिवस पाणी मिळेना ः अपुऱ्या पाणी पुरवठ्याने कोलमडले नियोजन
पिंपरी – स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे. मागील काही वर्षात दिवाळीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावेळीही परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने उन्हाळा सुरू होत नाही तोच आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला. एक दिवस पाणी कपात असताना पिंपळे गुरव, सांगवी, निगडी, आकुर्डी, भोसरी, दिघी, चऱ्होली, काळेवाडी, वाकड, रावेत, तळवडे आदी भागामध्ये कपातीनंतर दुसऱ्या दिवशीही विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवड हे पाण्याची मुबलता असलेले शहर होते. मात्र, मागील पाच वर्षात ही परिस्थिती बदलत चालली आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविली ही या वेळच्या टंचाईचे एक कारण असले तरी नियोजनाचा अभाव नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवत आहे. धरणाचे पाणी मिळत असले तरी मोठ्या वसाहती, सोसायट्यांकडून पावसाळी पाणी पुर्नवापर, सांडपाण्याचा पुर्नवापर होत नाही. त्याची सक्ती असतानाही त्याकडे कानाडोळा केला जातो. केवळ इमारतींच्या पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंत कागदी घोडे नाचविले जातात. महापालिका देखील डोळेझाकून दाखले देते. परिणामी पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पवना धरणात अपुरा पाणी साठा असल्यामुळे शहरातील विविध भागात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली जात आहे. इतर दिवशीही महापालिकेकडून विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
चऱ्होलीच्या वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई चऱ्होलीसह लगतच्या वाड्या-वस्त्यांमध्ये आत्तापासूनच तीव्र पाणी टंचाई सुरु झाली आहे. येथील सोसायट्यांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नळाला पाणी नसताना टॅंकरसाठी पाणी येते कोठून, असा सवाल चऱ्होलीकर करत आहेत. चऱ्होली गावठाणसह, वडमुखवाडी, चोविसावाडी, काळजेवस्ती, पठारेमळा, ताजणेवस्ती, बुर्डेवस्ती, दाभाडे वस्ती, साईनगर, जगताप वस्ती, काटे वस्ती या भागात पाणी समस्या तीव्र आहे.
सांगवी, पिंपळे गुरवला टॅंकरचा आधार सांगवी परिसरात दर शुक्रवारी पाणी पुरवठा बंद असतो. मात्र, अनेक नागरिकांना पाणीकपात लक्षात न आल्याने व काहींकडे पाणी साठवणूक सुविधा नसल्याने त्यांना पाणी बंदचा परिणाम शनिवारी जाणवतो. शनिवारी देखील विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तारांबळ उडते. भाडेकरूंनाही त्याचा फटका बसत आहे. काही जण गुरुवारीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवतात. मोठ्या सोसायट्यांना आठवड्यातून किमान दोनदा टॅंकर मागवावा लागत आहे. भोसरीत जलवाहिनीच्या कामामुळे टंचाई महापालिकेच्या वतीने भोसरीतील विविध भागांमध्ये चोविस तास पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ज्या भागात जलवाहिनी टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्या भागात नळजोडणी करण्यात आली आहे.
जुन्या जलवाहिन्या काढून अथवा बंद करुन नवीन वाहिन्यांमधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, नवीन जोडणीत त्रुटी आहेत. त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पूर्वी एक इंचाची जलवाहिनी होती. ती आता अर्धा इंच करण्यात आली आहे. परिणामी पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. काही जण मुख्य जलवाहिनीला पाइप जोडून पाणी घेत आहेत. त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी झुंबड उडालेली असते. दिघीतील भीमाशंकरनगर, साई पार्क, कृष्णानगर आदी भागांत गेल्या सहा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नवीन वस्तीत पुरेसे पाणी मिळत असून जुन्या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत आहे, असे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले.
मोशी-प्राधिकरणात विस्कळीत पाणी मोशी स्पाइन रस्त्यालगतचा प्राधिकरणाचा भाग आणि पुणे- नाशिक महामार्गालगतच्या परिसरात सध्या कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा होत आहे. प्राधिकरणातील पेठ क्रमांक चार, सहा, नऊ व अकरा आदी परिसरात कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. तसेच, महामार्गालगतच्या बोराटे वस्ती, संजय गांधीनगर, गंधर्वनगरी, तापकीरनगर, दक्षिण लक्ष्मीनगर, शिवाजी वाडी आदी भागांमध्येही सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या भागामध्ये पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे. महापौरांचा प्रभाग असलेल्या चिखली, कुदळवाडी परिसराला देखील असमान पाणी पुरवठा होत आहे. रुपीनगर, तळवडेवासियांकडून कमी वेळ परंतु, पुरेशा दाबाने पाणी पुरवठ्याची मागणी होत आहे.