Indapur : बाबीर यात्रेपूर्वीच पाणीटंचाईचे संकट
Indapur : बैठकीत तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याबरोबरच यात्रेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले.

कळस : रुई (ता. इंदापूर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बाबीर देवाची वार्षिक यात्रा येत्या १०, ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मात्र, यंदा परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये आणि यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी मंदिर परिसरात बैठक पार पडली.
बैठकीत तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याबरोबरच यात्रेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले. अनधिकृत पार्किंगला आळा घालणे, रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि निर्धारित पार्किंगच्या ठिकाणीच वाहने लावण्याचे नियोजन करण्यात आले. याशिवाय आरोग्य पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवणे, अवैध मद्यविक्री व चोऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्याचे ठरले. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती व ग्रामपंचायतीने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, मंडल अधिकारी रूपाली शेळके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रजत काटवटे, श्री बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि यात्रा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३ ते ४ लाख भाविकांसाठी पाण्याचे नियोजन
यंदाच्या यात्रेला अंदाजे तीन ते चार लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. उपलब्ध विहिरींमधील पाणी साठवण टाक्यांमध्ये सोडणे, तसेच विविध संस्था व प्रशासनाच्या माध्यमातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा झाली, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली.





