पुणे जिल्हा | मंचरला डिंभे धरणातून पाणी आरक्षण मंजूर

मंचर, (प्रतिनिधी) – मंचर शहरासाठी हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातून अतिरिक्त 4.94 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. या योजनेद्वारे डिंभे धरणातील पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
हे पाणी आरक्षण मंजूर झाल्याने मंचर शहरास डिंभे धरणातून बंदिस्त पाइपद्वारे पाणी भविष्यात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
सद्यस्थितीत मंचर शहरास पूर्वीपासून मंचर जवळील सुलतानपूर येथून घोड नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यातून पाणीपुरवठा होत आहे; परंतु उन्हाळ्यात शहरास पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
यासाठी मंचर नगरपंचायतीने शहरात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता व्हावी, याकरिता प्रथमच हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात नगरपंचायतीचे विशेष पाणी आरक्षण मिळावे. याकरिता मागणी प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. मंचर शहरासाठी हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणातून अतिरिक्त 4.94 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले असून या योजनेद्वारे डिंभे धरणातील पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे.
पाणी आरक्षणाबाबत मंचर नगरपंचायत ही प्रथम नगरपंचायत राज्यात ठरलेली आहे. शहराची वाढती पाण्याची मागणी व वाढती लोकसंख्या पाहता शासनाकडून वर्ष 2056पर्यंत पुरेल इतकी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशी माहिती गोविंद जाधव यांनी दिली.





