चिंबळी : गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे रस्ते आणि शेतात पाणी साचले असून, खरीप हंगामातील सोयाबीन आणि भात पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या संततधारेमुळे भाताचे पीक हिरवेगार झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईसह मावळ पट्ट्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे मोई-चिखली हद्दीतील इंद्रायणी नदीवरील पूलावरून पाणी वाहत असल्याने पायी चालणे आणि वाहनांची ये-जा महाळुंगे पोलिस चौकीच्या वतीने बंद करण्यात आली आहे.