Water Leakage : शहरात सध्या तब्बल ३२ टक्के पाणीगळती होत असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानेच दिली आहे. वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, मोठ्या प्रमाणातील पाणीगळती यामुळे शहराच्या पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गळतीत तब्बल सात टीएमसी पाणी वाया जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होते. नगरसेवक दत्ता बहिरट यांनी मुख्यसभेत पाण्याच्या गळतीची माहिती विचारली होती. त्यावर लेखी उत्तर देताना ही माहिती मिळाली आहे. पालिकेच्या माहितीनुसार, २०१७ पर्यंत जुन्या हद्दीसह नव्याने समाविष्ट गावांची एकूण लोकसंख्या ४४ लाख ४२ हजार ७०१ इतकी होती. २०२५-२६ मध्ये शहराची लोकसंख्या ७७ लाख ७६ हजार ६१ इतकी झाली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषांनुसार शहरासाठी दरडोई किमान १३५ लिटर पाणी आवश्यक आहे. २०१७-१८ मध्ये पुण्यासाठी १६.९६ टीएमसी पाण्याची गरज होती. त्यावेळी तेवढाच पाणीपुरवठा होत होता. २०२५-२६ मध्ये शहरासाठी २१.०३ टीएमसी पाण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मात्र जलसंपदा विभागाकडून यावर्षी १४.६१ टीएमसी पाणीकोटा मंजूर झाला आहे. मात्र, पालिका त्यापेक्षा जादा पाणी घेते. सध्या समाविष्ट गावांसह महापालिकेस मिळणाऱ्या पाण्यातील ३२ टक्के पाणीगळती होत असल्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे. नागरिकांच्या तक्रारी, दैनंदिन पाहणी आणि तपासणीदरम्यान आढळणाऱ्या गळतीच्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती केली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच मुख्य वितरण वाहिन्या आणि मिळकत जोडण्यांवर मीटर बसवून गळती रोखण्याचे काम सुरू असल्याचेही उत्तरात म्हटले आहे.