Pune District : अखेर रोटी तलावात पाणी दाखल
Pune District : अखेर खासदार सुळे, आमदार कुल यांनी दखल घेत जनाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी लोकवर्गणी, युवकांनी केलेल्या पाठपुराव्याने तलावात पाणी पोहोचले आहे.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गालगत असलेल्या रोटी गावच्या तलावात अखेर जनाई शिरसाई योजनेच्या प्रकल्पातून पाणी पोहोचले. ऐन दुष्काळात पाणीटंचाईचा तात्पुरता प्रश्न सुटल्याने नागरिक आणि शेतकरी सुखावला आहे.
अनेक दिवसांपासून रोटी परिसरात पाणी टंचाई भासत होती. शेतपिके आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि तलावातील पाणी साठा संपुष्टात आल्याने पाणी टंचाई निर्माण झाली होती. तलावात पाणी सोडण्यात यावे यासाठी ग्रामस्थ मागील काही दिवसांपासून पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करीत होते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
अखेर खासदार सुळे, आमदार कुल यांनी दखल घेत जनाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी लोकवर्गणी, युवकांनी केलेल्या पाठपुराव्याने तलावात पाणी पोहोचले आहे.
रोटी गावच्या तलावापर्यंत पाणी पोहोचविण्याच्या मार्गात कालव्याची गळती ही मोठी अडचण ठरत होती. ही समस्या दूर करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गळतीच्या ठिकाणी प्लॅस्टिक आच्छादन (लायनिंग) उपलब्ध करून दिले.
तलावात पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी १२ दिवस सलग पाणी पोहोचण्याची आवश्यक आहे. जलसंपदा विभागाने पुढील दोन आठवडे अखंडित पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तलावात मे महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा तलावात उपलब्ध करावा, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.





