Nagar | मुसळधार पावसाने घरात घुसले पाणी

पाथर्डी, (प्रतिनिधी): शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या गटारी तुंबल्या. कसबा विभागात असलेल्या अनेक घरात पाणी घुसले तर जानकीबाई अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका इसमाने उभा केलेला पूल वाहून गेला.
आज दुपारी शहरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दोन तास झालेल्या या पावसामुळे मात्र नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. शहराच्या कसबा विभागात खोलेश्वर मंदिर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर असा रस्ता करण्यात आला. या रस्त्यावर एका ठिकाणी छोटा पूल उभारण्यात आला आहे.
या पुलाखाली असलेल्या नळ्या तुंबल्यामुळे या ठिकाणी पाणी साचले. हे पाणी या पुलालगत राहत असलेल्या पार्वती थोरात ,गंगाराम थोरात यांच्यासह अनेकांच्या घरात शिरले. पार्वती थोरात यांच्या घरातील गॅसची टाकी सुद्धा या पाण्यात तरंगत होती.
अनेकांच्या दुचाकी भोवती मोठे पाणी साचल्याने त्यांना आपल्या दुचाकी सुद्धा पावसाचा जोर कमी होईपर्यंत पाण्यातून बाहेर काढता आल्या नाहीत.अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
शहरात दोन स्मशानभूमी असून जानकीबाई स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पालिकेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केला, मात्र अजूनही या पुलाचे काम पालिकेने सुरू न केल्याने या रस्त्यालगत राहणारे राम शिंदे यांनी पदरमोड करत या ठिकाणी एक छोटासा पूल बांधला. त्याच्याखाली नळ्या सुद्धा टाकल्या मात्र आज झालेल्या पावसामुळे हा पूल खचल्याने आत स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.





