Water Crisis: पाण्याबाबत पालिकेत तक्रारींचा महापूर
Water Crisis:

विस्कळीत, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार
Water Crisis: महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या मुख्य सभेत पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारीचा महापूर आला. लांबलेला पाऊस, धरणातील पाणीसाठ्याने गाठलेला तळ आणि शहरातील दिवसाआडच्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले असून नगरसेवकांनी आपल्या भागातील तक्रारींना सभेत वाट करून दिली.
कमी दाबाने पाणी येणे, एकदिवसआड पाणी न येणे, पाइपमध्ये हवेच्या दाबाने पाणीपुरवठा विस्कळीत होणे, मागवलेले टँकर वेळेनंतर येणे, अव्वाच्या सव्वा पैसे मागून नागरिकांची हणारी अडवणूक, मेसेज केला तरी उत्तर नाही, मागणी करूनही टँकर कधी येतच नाही, आला तर हवे तेवढे पाणी नाही, टँकर पाॅइंट वाढवा, एका टँकरसाठी ठेकेदारांकडून पाच ते सात हजारांची मागणी, बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोअरवेलमधील पाणी पुरवठा अशा एक ना अनेक तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या.
पुनीत जोशी, प्रियंका शेंडगे, ऐश्वर्या पठारे, धनश्री कोल्हे, महेश वाबळे, दत्ता बहिरट, प्रशांत जगताप, सीमा बेलदरे, हेमलता मगर, नितीन गावडे, व्यंकोजी खोपडे, धनेश कल्याणकर, रवींद्र साळेगावकर, अण्णा बांदल. सई थोपटे आदी सर्वपक्षीय नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला.
यावर प्रशासनाकडून पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सध्या रोज १७०० टँकर लागतात. सध्या टँकरची संख्या वाढवली आहे. शहरात एकदिवस आड पाणीपुरवठा होतो. ज्या दिवशी पाणीपुरवठा होत नाही, त्यादिवशी टँकर मागवले जातात. परंतु ते अपेक्षित नाही. पाणीबचतीसाठी कपात केली आहे, त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे.
पाणीकपात जाहीर झाल्यानंतर नियोजन सुरळीत होईपर्यंत एक आठवडा तक्रारी येत होत्या. त्याचे निराकरण केले आहे. आता ज्यांच्या तक्रारी आहेत, त्याही सोडविल्या जातील. भामा आसखेड मधून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो, तेथील दूषित पाण्याची समस्याही सुटल्याने आता येत्या १२ जुलैपासून तेथेही एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच मनुष्यबळाच्या अभावामुळे थोडी दिरंगाई होते आहे, हे जगताप यांनी यावेळी कबूल केले.
प्रशासनाची भूमिका
अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, धरणात सध्या ३.६ टीएमसी पाणी आहे. या कालावधीत मागील वर्षी १२.५ टीएमसी पाणी होते. सध्याच्या कपातीमुळे पाण्याची २५ टक्के बचत होत आहे. सध्या आठ टँकर पाॅइंट आहेत. आणखी तीन सुरू करणार आहे. याठिकाणी सीसीटीव्ही माॅनिटरींगचे काम सुरू आहे.
वेबसाइटवरही टँकरची माहिती दिली आहे. त्याचा ट्रॅकही नागरिकांना गेता येतो. खासगी टँकर बंद करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, तो एक-दोन दिवसांत घेण्यात येईल. तसेच कनिष्ठ अभियंत्यांची भरती झाली असून १७० उमेदवार १० जुलै पर्यंत रुजू होतील. खासगी बोअरवेलबाबत महापालिका निर्णय घेऊ शकणार नाही, ही बाब राज्यसरकारच्या अखत्यारीती असलेल्याचे त्यांनी सांगितले.





