नवी दिल्ली – समाज माध्यमे अर्थात सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे असे म्हणतात. ते खरेच आहे. कारण याचा वापर करून कोणाला तरी उध्वस्त करता येऊ शकते तर याचाच वापर करून उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेले कोणाचे तरी घर सावरलेही जाउ शकते. तसेच समाजात संवोदनशीलता अजुन संपलेली नाही याचीही प्रचिती या माध्यमाच्या ताकदीतून येत असते.
दिल्लीत त्याचाच एक जिवंत नमूना पाहायला मिळाला. येथील मालवीय नगरमध्ये एक वृध्द दाम्पत्य आहे. दोघांनी वयाची 80 ओलांडली आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मात्र कोणी त्यांना विचारत नाहीत. त्यांना जगायचे आहे. त्यासाठी बाबा का ढाबा काढून त्यांची जगण्याची धडपड सुरू आहे.
मात्र करोनाला या धडपडीचे काय? भल्याभल्यांना त्याने गारद केले आहे. तर या ढाब्याचे काय मोल? लॉकडाउनमध्ये सगळं थंडच होतं. मात्र अनलॉक झाल्यावरही व्यवहार पूर्ण जोमाने सुरू झालेले नाही. त्यामुळे बाबांच्या ढाब्याची चूल थंडच. हताश झालेल्या बाबांना ग्राहकांची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाही. पण संयम कसा धरणार आणि आणणार कोठून?
बाबांच्या संयमाचा बांध फुटला. धीर खचला. त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. एका युवकाने त्यांचा रडतानाचा हा व्हिडिओ टीपला आणि व्हायरल केला. या व्हिडिओने काही तासांतच कमाल करून दाखवली आणि असंख्य हात बाबांच्या मदतीला सरसावले.
बऱ्याच लोकांनी बाबा का ढाबाचा रस्ता धरला आणि गर्दी आवरणे अवघड झाले. चित्रपट कलाकारांनाही या व्हिडिओने हेलावून टाकले. अभिनेत्री रविना टंडन, रणदीप हुडा यांनीही व्हिडिओ शेअर केला. या ढाब्यावर अवश्य जा आणि तुमचा व्हिडिओ आम्हाला पाठवा असे आवाहन त्यांनी केले. अभिनेता सुनील शेट्टी, स्वरा भास्करही यात सामिल झाले. चला बाबांचे हास्य परत आणू असे सगळीकडेच मेसेज फिरले आणि गर्दी झाली.
वृध्द दाम्पत्याला वाढपी किंवा अन्य कामे करण्यास मदत करण्याची तयारीही अनेक सोशल मीडियाधारकांनी दर्शवली आहे. या माध्यमाचा वापर चांगला झाला तर समाजात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो अशी सुखद हमी या छोट्या घटनेने दिली एवढे मात्र नक्की!