PM Modi’s favorite movie : वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी पाहिला ‘गाईड’; जाणून घ्या PM मोदींच्या आवडत्या सिनेमाचा खास किस्सा
PM Modi's favorite movie : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव आनंद यांच्या ‘गाईड’ या क्लासिक हिंदी चित्रपटाचे चाहते असल्याचे त्यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे.

PM Modi’s favorite movie : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यात काही घटना आणि व्यक्तिमत्त्वांचा विशेष प्रभाव पडला. त्यापैकीच एक म्हणजे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचा ‘गाईड’ हा चित्रपट.
१५ व्या वर्षी पाहिला गाईड (PM Modi’s favorite movie)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देव आनंद यांच्या ‘गाईड’ या क्लासिक हिंदी चित्रपटाचे चाहते असल्याचे त्यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे. देव आनंद आणि अभिनेत्री वहीदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९६५ मध्ये प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे, मोदींनी वयाच्या १५ व्या वर्षी हा चित्रपट पाहिला आणि त्यांच्या विचारांवर खोलवर परिणाम झाला.
मित्रांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही (PM Modi’s favorite movie)
मोदींना ‘गाईड’मधील सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यामागची विचारधारा. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन हे बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्यातून मिळू शकते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी मित्रांसोबत त्याच्या संकल्पनेवर चर्चा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांच्या या विचारांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचेही मोदींनी सांगितले होते.
सामाजिक आशयाने लक्ष वेधून घेतले (PM Modi’s favorite movie)
‘गाईड’मधील ग्रामीण भागातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची दृश्येही मोदींच्या मनावर ठसली होती. या दृश्यांमधून ग्रामीण भारतातील भीषण वास्तव आणि सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटातील सामाजिक आशयानेही त्यांचे लक्ष वेधून घेतले.

गाईड सिनेमातील एक सीन
मोदींनी देव आनंद यांचं केलं होतं कौतुक
मोदींनी अनेक प्रसंगी देव आनंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आहे. २६ सप्टेंबर २०२३ रोजी देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना मोदींनी त्यांचे कौतुक केले होते. देव आनंद यांच्या चित्रपटांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर बदलत्या समाजाचे आणि भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंबही त्यात उमटले, असे मोदींनी म्हटले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोदी म्हणाले…
२०१८ मध्ये लडाखमधील विद्यार्थ्यांच्या एका गटाने पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी एका विद्यार्थ्याने मोदींना त्यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल विचारले. चित्रपट पाहण्यासाठी सध्या फारसा वेळ मिळत नसल्याचे सांगत मोदींनी आपल्या लहानपणी आणि तरुणपणी पाहिलेल्या काही चित्रपटांचा उल्लेख केला. यामध्ये ‘गाईड’ला त्यांच्या मनात विशेष स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
गाईड चित्रपटाची नेमकी कथा
विशेष म्हणजे, ‘गाईड’ हा प्रदर्शित झाला त्या काळातील अनेक हिंदी चित्रपटांपेक्षा वेगळा होता. देव आनंद यांनी साकारलेला राजू सुरुवातीला एक साधा टूरिस्ट गाईड असतो. मात्र, परिस्थिती त्याला अशा वळणावर घेऊन जाते, जिथे लोक त्याच्याकडे एका आध्यात्मिक व्यक्तीच्या रूपात पाहू लागतात. दुसरीकडे, वहीदा रहमान यांनी साकारलेली रोझी ही व्यक्तिरेखा त्या काळातील सामाजिक बंधने झुगारून स्वतःची ओळख, इच्छाशक्ती आणि स्वातंत्र्याचा शोध घेणाऱ्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करते.





