मंचर : पारगाव मंगरूळ परिसरात कांदा काढणीसाठी आलेल्या बाहेरगावच्या मजुरांचा रोहित बाबू कापरे (वय ८) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.त्यामुळे बिबट्या नरभक्षक कोणता या चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी पिंपरखेड येथे मारलेला बिबट्या नरभक्षक होता का? वनविभागाच्या दाव्यांवर संशय, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरखेड येथे सुमारे एक महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याच परिसरात शार्प शुटरच्या मदतीने नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला होता. त्यानंतर परिसरात काही काळ वातावरण शांत झाले होते. मात्र, सोमवार दि.१५ रोजी पारगाव मंगरूळ परिसरात कांदा काढणीसाठी आलेल्या बाहेरगावच्या मजुरांचा रोहित बाबू कापरे (वय ८) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे बिबट्या नरभक्षक कोणता या चर्चेला उधाण आले आहे.या नव्या घटनेमुळे वनविभागाच्या आधीच्या दाव्यांबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.वनविभागाने सांगितलेला बिबट्या खरोखरच नरभक्षक होता का, असा थेट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.नागरिकांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की, लोकांचा संताप शांत करण्यासाठी कोणत्याही बिबट्याला ठार करून त्यालाच नरभक्षक घोषित करण्यात आले का? जर खरोखरच नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात आले असेल, तर रोहित कापरे या बालकावर हल्ला करणारा बिबट्या पुन्हा नरभक्षकच आहे का, की परिसरात एकाहून अधिक धोकादायक बिबट्यांचा वावर आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या एकूणच कार्यपद्धतीवर संशयाचे ढग दाटले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.वारंवार मानवी जीव जात असताना ठोस उपाययोजना का होत नाहीत, बिबट्यांची संख्या, हालचाली आणि नेमका धोका याबाबत पारदर्शक माहिती का दिली जात नाही, अशी विचारणा केली जात आहे. नागरिकांनी तातडीने सखोल तपास, प्रभावी बंदोबस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्ट खुलासा करण्याची मागणी केली आहे. संभ्रम… पिंपरखेड येथे एक महिन्यापूर्वी बिबट्याने बालकाला ठार केल्यानंतर शार्प शूटरकडून नरभक्षक बिबट्या ठार केले. आणि तेथून अवघ्या अडीचशे मीटर अंतरावर असलेल्या पारगाव येथील बालकाला सोमवारी सकाळी बिबट्याने ठार केले. त्यामुळे पूर्व मारलेला बिबट्या नरभक्षक बिबट्या होता का ? याबाबत संभ्रम आहे. नरभक्षक बिबट्याने आपले लक्ष्य बालकांकडे वळवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळेत मुलांना पाठवायचे की नाही यापर्यंत या विचारापर्यंत पालक आल्यामुळे भविष्यात शिक्षण व्यवस्था ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे.प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. – राधेश्याम शिंदे,उद्योजक, अवसरी खुर्द.