Janhvi Kapoor: ईशान खट्टरला डेट करत होती जान्हवी कपूर? शिखरसोबतच्या नात्याची दिली कबुली; ‘पेद्दी’ वादावरही सोडलं मौन!
Janhvi Kapoor ‘कॉफी विद करण ९’च्या या भागात करण जोहरने जान्हवीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. ‘तू खरंच शिखरला डेट करत आहेस का?’ असा थेट प्रश्न करणने विचारला. त्यावर जान्हवीने होकार देत शिखरसोबतच्या नात्याची कबुली दिली. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना एवढी उत्सुकता का असते, हे समजत नसल्याचेही तिने सांगितले.

Janhvi Kapoor: करण जोहरच्या ‘कॉफी विद करण ९’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांनी हजेरी लावली. शोच्या तिसऱ्या भागात जान्हवीने तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते चित्रपटांशी संबंधित वादांपर्यंत अनेक विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी तिने शिखर पहाडियासोबतच्या नात्याची कबुली दिली. तसेच, ईशान खट्टरसोबतच्या नात्याबद्दल झालेल्या चर्चांवर आणि ‘पेद्दी’ चित्रपटातील दृश्यांवरून निर्माण झालेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली.
शिखरसोबतच्या नात्याची जान्हवीने दिली कबुली
‘कॉफी विद करण ९’च्या या भागात करण जोहरने जान्हवीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. ‘तू खरंच शिखरला डेट करत आहेस का?’ असा थेट प्रश्न करणने विचारला. त्यावर जान्हवीने होकार देत शिखरसोबतच्या नात्याची कबुली दिली. मात्र, आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना एवढी उत्सुकता का असते, हे समजत नसल्याचेही तिने सांगितले.
यानंतर करणने जान्हवीच्या आयुष्यातील जुन्या नात्यांचाही उल्लेख केला. जान्हवी आधी शिखरला डेट करत होती, त्यानंतर तिचे नाव ईशान खट्टरसोबत जोडले गेले आणि पुढे आणखी कोणीतरी तिच्या आयुष्यात आले, असे करण म्हणाला. मात्र, या सगळ्या काळात शिखर तिच्या सोबत उभा राहिल्याचेही त्याने नमूद केले. ईशानचा उल्लेख होताच जान्हवीने करणला आपण या विषयात जरा जास्तच खोलात जात असल्याचे सांगितले.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर शिखरने घेतला होता अभ्यासातून ब्रेक
जान्हवीने शिखरच्या स्वभावाचे आणि तिच्या कठीण काळात त्याने दिलेल्या आधाराचे कौतुक केले. अभिनेत्रीची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर शिखरने अभ्यासातून ब्रेक घेतला आणि तो थेट मुंबईत आला होता. जान्हवीला त्याची गरज भासल्यास तो तिच्या जवळ असावा, यासाठी तो जवळपास महिनाभर मुंबईत राहिला होता.
करण जोहरनेही या प्रसंगाची आठवण सांगितली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर शिखर जान्हवीच्या सोबत असल्याचे पाहून त्यांच्या नात्यात अजूनही काहीतरी खास असल्याचे त्याला जाणवले होते. शिखरचा हाच स्वभाव सगळ्यांना आवडतो, असे जान्हवीने सांगितले. कठीण प्रसंगात आपल्यासाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व तिच्या बोलण्यातून अधोरेखित झाले.

Janhvi Kapoor
वरुण धवनला पाहून जान्हवीने फोडला होता ग्लास!
या भागात जान्हवी आणि वरुण धवन यांच्या मैत्रीबद्दलही एक मजेशीर किस्सा समोर आला. ‘तुला आणि वरुणला चांगली मैत्री झाली आहे, असे कधी जाणवले?’ असा प्रश्न करणने जान्हवीला विचारला. यावर उत्तर देताना जान्हवीने ‘बवाल’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला प्रसंग सांगितला. सेटवर वरुणला पाहून ती इतकी उत्साहित झाली होती की, तिच्या हातातील ग्लासच फुटला. त्यावेळी वरुण तिला मिठी मारण्यासाठी तिच्या दिशेने येत होता; मात्र तिच्या हातातील ग्लास फुटल्यामुळे तो मध्येच थांबला. हा किस्सा सांगताना जान्हवीने त्या प्रसंगामागील उत्साह आणि दोघांमधील मैत्रीची झलक दाखवली.
‘पेद्दी’ चित्रपटातील दृश्यांवरून झालेल्या वादावर काय म्हणाली जान्हवी?
जान्हवीच्या ‘पेद्दी’ चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. या दृश्यांच्या चित्रीकरणाच्या पद्धतीवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. या विषयावर बोलताना जान्हवीने सांगितले की, त्या काळात तिला अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. या प्रकरणावर प्रतिक्रिया द्यावी की शांत राहावे, हे तिला सुरुवातीला समजत नव्हते.
या प्रकरणात ती कोणालाही दोष देत नसल्याचे स्पष्ट करत जान्हवी म्हणाली की, तिने दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास ठेवला होता. मात्र, चित्रीकरणाच्या वेळी कोणत्या कोनातून दृश्ये चित्रित केली जाणार आहेत, याबाबत तिला पुरेशी स्पष्टता नव्हती. या अनुभवातून तिने महत्त्वाचा धडा घेतला असून, यापुढे आपल्या दृश्यांचे चित्रीकरण कोणत्या पद्धतीने केले जाणार आहे, याकडे अधिक लक्ष देणार असल्याचे तिने सांगितले.
दक्षिण भारतीय चित्रपटांच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना जान्हवीने सांगितले की, प्रत्येक दृश्य कोणत्या कोनातून चित्रित केले जाईल, याची माहिती आधीपासून स्पष्टपणे दिली जातेच असे नाही. या अनुभवामुळे सेटवर तिला अस्वस्थ वाटले होते. मात्र, या प्रकरणात प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या नाराजीबद्दल तिने समाधान व्यक्त केले.
तिच्या मते, या विरोधामुळे भविष्यात अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी अधिक काळजी घेतली जाऊ शकते आणि इतर अभिनेत्रींना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे ‘कॉफी विद करण ९’मधील जान्हवीच्या या वक्तव्यांची सध्या चर्चा होत आहे.





