पिंपळवंडी -करोना महामारीला थोपवण्यासाठी करोना वॉरियर्स जीवावर उदार होऊन लढा देत आहेत; मात्र जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये नागरिकांना त्याचे गांभीर्य वाटत नाही.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात करोना रोगाचे संक्रमण होऊ नये यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी दररोज नियमितपणे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील 30 गावांमध्ये रोज संपर्क करून गावात कोणी नवीन रहिवासी आला आहे का, याचबरोबर करोनासंदर्भात काय काळजी घ्यावी, यासाठी लोकांना प्रबोधन करीत आहे; मात्र या रोगाचे संक्रमण न होण्यासाठी या काही गावांतील ग्रामस्थ प्रतिसाद देत नसल्याने या करोना योद्ध्यांवर हतबल होण्याची वेळ आली आहे.
मास्क न लावणे, गावात गर्दी करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, विलगीकरण असूनही इतरत्र फिरणे हे प्रकार वाढले आहेत. अनेक गावांमध्ये दुकानांचा पुढील दरवाजा बंद करून सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे चालू असल्याचेही दिसत आहे. यामध्ये हॉटेल, किराणा दुकान, कापड दुकान, पानटपरी ही सर्व दुकाने बिनधास्तपणे चालू आहेत.
पुणे-मुंबईकरांत गांभीर्य नाही
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पुणे-मुंबई या ठिकाणावरून सुमारे 5000 नागरिक आलेले आहेत. या नागरिकांना प्रशासनाने विलगीकरण करून ठेवले असतानासुद्धा ते गावात व परिसरात भटकंती करत असल्याचे दिसत आहे. नियम पाळले नाही आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोयीच्या राजकारणासाठी चुका करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर करोना माफ करणार नाही. यासाठी प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या गावांमधील नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे.