नवी दिल्ली – जगभरातील गुंतवणूकदारांचे मार्गदर्शक असलेले यार्कशायर हॅथवे या गुंतवणूक विषयक कंपनीचे प्रदीर्घकाळ मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले वॉरेन बफे वर्षाच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. आता आपण फारसे काही बोलणार नाही, असे बफे यांनी गुंतवणूकदारांना पाठविलेल्या आपल्या अखेरच्या पत्रात नमूद केले. 94 वर्षाचे अब्जाधीश बफे आपल्या कारकिर्दीत कमावलेली सर्व संपत्ती सामाजिक कामासाठी खर्च करणार आहेत. त्यांनी अगोदरच बराच खर्च केला आहे आणि उरलेले 149 अब्ज डॉलर (एक अब्ज डॉलर म्हणजे 9,000 कोटी रुपये) संबंधित संस्थांना उपलब्ध करणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भागधारकांना पाठविलेल्या शेवटच्या पत्रात बफे यांनी सांगितले की, वय वाढल्यामुळे आपल्या सक्रियतेवर परिणाम झाला आहे. मी सध्या आठवड्यातील पाच दिवस काम करतो. मात्र जानेवारीनंतर आपण काम करणार नाही आणि फारसे बोलणार नाहीत. आपल्याकडे असलेली सर्व रक्कम शक्य तितक्या लवकर समाज उपयोगी कामासाठी उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून ही रक्कम इतर बाबीकडे वळणार नाही असे बफे यांनी सांगितले. बफे आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी सर्व श्रीमंत व्यक्तींनी आपल्या हयातीत आपल्याकडील अतिरिक्त रक्कम समाज उपयोगी कामासाठी उपलब्ध करण्याची मोहीम 25 वर्षांपूर्वी सुरू केली होती. या मोहिमेला जगभरातील सधन व्यक्तींनी उत्तम प्रतिसाद दिला होता. बफे यांच्या जागेवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रेगरी अॅबेल काम करणार आहेत. ही कंपनी आगामी काळातही अमेरिकेसह जगभरातील गुंतवणूकदारांचा दीपस्तंभ ठरेल अशी आशा बफे यांनी व्यक्त केली आहे. बफे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणावर वेळोवेळी कठोर प्रहार केले आहेत. आयात शुल्काचा वापर शस्त्र म्हणून करणे अनैतिक आहे. अमेरिकेसह सर्वच देश आपल्या चलनाचे अवमूल्यन करीत असल्याबद्दल त्यांनी वेळोवेळी खेद व्यक्त केला आहे.