ढाका : बांगलादेशातील एका न्यायालयाने रविवारी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना, त्यांची बहीण शेख रेहाना, ब्रिटिश खासदार ट्यूलिप रिझवाना सिद्दीक आणि इतर ५० जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. राजकीय सत्तेचा गैरवापर करून जमीन बेकायदेशीरपणे संपादित केल्याच्या आरोपाखाली या सर्वांविरोधात वॉरंट बजावण्यात आले आहे. ढाका महानगर दंडाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार विरोधी आयोगाने दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या आरोपपत्रांचा विचार केल्यानंतर हे वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत. अटक आदेशांच्या अंमलबजावणीच्या अहवालांचा आढावा घेण्यासाठी न्यायाधीशांनी २७ एप्रिलची तारीख निश्चित केली आहे, असे एसीसीचे सहाय्यक संचालक अमीनुल इस्लाम यांच्या हवाल्याने सांगितले. भूखंड वाटपात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरील तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एसीसीने अलीकडेच ५३ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले. हसीना यांच्यासह सर्व ५३ आरोपी फरार असल्याने, न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. दिनांक १० एप्रिल रोजी याच न्यायालयाने राजुक भूखंड वाटपाशी संबंधित एका वेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात हसीना, त्यांची मुलगी साईमा वाजेद पुतुल आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. पुतुल १ नोव्हेंबर २०२३ पासून नवी दिल्ली येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाई प्रादेशिक संचालक म्हणून काम पाहत आहेत. एसीसीने १३ जानेवारी रोजी रेहानाविरुद्ध पूर्वाचल न्यू टाउन प्रोजेक्टमध्ये अधिकाराचा गैरवापर करून १० काठाचा भूखंड घेतल्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला होता. या खटल्यात १५ जणांची नावे होती, यात हसीना आणि रेहानाची मुलगी ब्रिटिश खासदार ट्यूलिप रिझवाना सिद्दीक यांचा समावेश होता. रेहानाने हसीना यांच्या मागील राजवटीत कोणतेही अधिकृत पद भूषवले नव्हते.