सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सूचना
पुणे – हवामान खात्याने दि.13 ते दि.17 ऑक्टोंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत, महावितरण, बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, जलसंपदा आणि आरोग्य विभाग यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच शोध व बचाव पथक, बचाव साहित्य आदी सुविधा तयार ठेवण्याच्या सूचना सर्व शासकीय विभागांना दिल्या आहेत.
वादळामुळे झाडे पडून रस्ते वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. ग्रामीण भागातील तहसीलदार यांनी मुख्यालयात परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे. महानगरपालिका यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांचे सर्व कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पूर्ण वेळ उपलब्ध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरिता रुग्णवाहिका, आरोग्य अधिकारी यांच्यासह जेसीबी मशीनसह आवश्यक ती यंत्रसामग्री तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
घ्यावयाची दक्षता…
– मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा
– पावसात झाडाखाली थांबू नका
– मोबाइलवर संभाषण करू नये
– इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे
– अफवांवर विश्वास ठेऊ नये.
– पुराच्या पाण्यात सेल्फी काढू नये
आपत्कालीन परिस्थितीत 020-26123371 अथवा 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा.