गणेशोत्सवात वरुणराजा बरसणार

कोकणासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई – राज्यात सर्वदूर पावसाचा जोर कायम असून गणेशोत्सवातही वरुणराजाची कृपा असणार आहे. पुढील काही दिवस कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याशिवाय ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगाने कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सोबतच वाऱ्यांचा वेग 45 ते 55 किलोमीटर इतका असणार आहे. मच्छिमार बांधवांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.
मुंबईत पावसाची संततधार कायम असून, गुरूवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दुसरीकडे समुद्राला उधाण येणार असून मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.





