पुणे | तरुण पिढीच्या वैचारिक बांधणीसाठी वारकरी संप्रदायाने पुढाकार घ्यावा – शरद पवार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रिय व्हावे लागेल.
तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यात संत विचारांच्या मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मीही वैष्णव विचारांचा असून, पांडुरंगाचे दर्शन घेतो. मात्र, त्याचा फारसा गाजावाजा करत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी अध्यात्मिक आणि वारकरी आघाडीच्या वतीने आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाच्या समारोपाला पवार उपस्थित होते. यावेळी संमेलनाध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
समाजमन पुरोगामी विचारांवर आधारित असावे. कर्मकांड, रूढी परंपरा याविरोधात भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडीच्या नावाने काम करणारे अनेक लोक ठराविक भूमिकेतून विचार मांडण्यावर भर देत आहेत. त्यातून जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सुसंवाद करण्याची गरज मला नेहमी वाटते.
चुकीच्या गोष्टीना खतपाणी घालणाऱ्यांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. आपल्या विचारांची व्यापकता वाढवून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम केले पाहिजे. ढोंगी राजकारण, समाजकारण करणाऱ्यांना योग्यवेळी चोप देण्याचे काम संताच्या विचारांनी केले आहे. त्याच विचारावर आधारित सामंजस, मैत्रीपूर्ण समाज घडवणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले. पाटील, मोरे आदींची भाषणे झाली.
‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात डॉ. रफिक सय्यद, हभप राजेंद्र येप्रे महाराज, हभप बालाजी महाराज जाधव,
हभप ज्ञानेश्वर महाराज रक्षक, हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, हभप ज्योतीताई जाधव महाराज, हभप गणेश महाराज फरताळे यांनी विचार मांडले. हभप श्यामसुंदर महाराज यांनी सूत्रसंचालन केले. हभप मुबारक महाराज शेख यांनी आभार मानले.
वारकऱ्यांच्या व्यासपीठावर येणार म्हटल्यावर काहींच्या मनात अस्वस्थता – पवार
माझ्याविषयी अनेकदा अस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो. मात्र, सर्वधर्म समभावाचा विचार देणाऱ्या वारकरी संप्रदाय मी मानतो. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो परंतु दर्शन घेताना त्याचा गाजावाजा करत नाही.
माझ्या अंतःकरणात पांडुरंगाचा, ज्ञानोबा-तुकोबाचा विचार असतो. त्यामुळे मानसिक समाधान मिळत राहते. वारकऱ्यांच्या व्यासपीठावर येणार म्हटल्यावर काही लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मला पोलिसांचा फोन आला.
परंतु, वारकरी संप्रदायाचा विधायक विचार जतन करावा आणि नवीन पिढीत तो रुजावा, यासाठी वारकऱ्यांसोबत ताकदीने उभा राहणार असल्याचे त्यांना कळवले, असेही शरद पवार यांनी नमूद केले.





