Pune Crime : वारजे पोलिसांची गजा मारणेसह ‘त्या’ नऊ जणांना नोटीस

पुणे – वारजे पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना तपासकामी हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे. गजा मारणेवर वारजे पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमाअंतर्गत जामीन मिळणे अवघड असल्याने गजा मारणेने पळ काढला आहे.
गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांची रॅली चांदणी चौकातून जात असताना वारजे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांनी “रॅलीसाठी परवानगी काढली आहे का?’ अशी विचारणा केली होती. यावेळी त्यांना ढकलून देत दहशत निर्माण करण्यात आली होती.
या गुन्ह्यात गजा मारणे व साथीदारांना अटक करण्यासाठी वारजे पोलीस ठाण्याचे पथक मुळशी येथे मारणेच्या फार्म हाऊसवर गेले होते. त्यांच्या घरझडत्या घेतल्या होत्या, तरीही ते सापडले नाहीत.
दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीत गजानन उर्फ गजा मारणे, प्रदीप कंधारे, बापू बागल, अनंता कदम, गणेश हुंडारे, रुपेश मारणे, सुनील बनसोडे, श्रीकांत पवार, सचिन ताकवले, संतोष शेलार यांची नावे आहेत.
गजा मारणेवर पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात रॅली संदर्भात अनेक गुन्हे दाखल आहेत. वडगाव मावळ न्यायालयात जामिनसाठी हजर राहिल्यानंतर गजा मारणे अद्यापही पोलिसांच्या हाती आला नाही.
गजा मारणेने तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर भव्य रॅली काढत पुणे शहरात प्रवेश केला होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी रस्त्यात टोल भरला नाही तसेच फुडमॉलमध्ये खाद्य पदार्थ घेतल्यावर त्याचे पैसेही दिले नाही. यांसदर्भात दरोड्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. रॅलीचे ड्रोणने चित्रीकरण करण्यात आले होते. त्याचे स्टेटस शेकडो तरुणांनी ठेवले होते. तर रॅलीमध्ये शेकडो आलिशान गाड्या सहभागी झाल्या होत्या. या गाड्याही कोथरुड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.





