पिंपरी (प्रकाश यादव) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची ठरली आहे. या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान झाले असून कोणत्या प्रभागात किती मतदान झाले आहे, याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे प्रभागात मिळालेले मतदान पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नेते मंडळींसाठी तसेच माजी नगरसेवकांसाठी फायदेशीर किंवा नुकसानदायक ठरणार आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभेसाठी रविवारी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत जगताप-काटे आणि कलाटे यांच्यात झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार 946 पुरुष तर दोन लाख 65 हजार 974 महिला आणि तृतीयपंथी 34 मतदार आहेत. या पोटनिवडणुकीत 50.53 टक्के मतदान झाले. 2 लाख 87 हजार 479 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये पुरुष 1 लाख 58 हजार 185, महिला 1 लाख 29 हजार 288 व इतर सहा जणांचा समावेश आहे.
13 प्रभाग 52 नगरसेवक
चिंचवड मतदार संघात महापालिकेचे 13 प्रभाग येत असून 52 नगरसेवक निवडून जातात. महापालिकेतील सत्तेचा सोपान हा चिंचवड मतदार संघातून जात आहे. ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेससह महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अत्यंत गंभीर्याने घेतला. गेलेली सत्ता पुन्हा प्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादीने चंग बांधला आहे. तर याच निवडणुकीला महापालिकेच्या निवडणुकीची पहिली पायरी मानत भाजपनेही आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी चंग बांधला. त्यामुळे सर्वच पक्षांच्या अति वरिष्ठ नेत्यांनी शहरात ठाण मांडले होते. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नेत्यांनी अतिशय नियोजनपूर्वक निवडणूक लढविली. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि प्रचंड चुरशीची झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत-जास्त मतदारांपर्यत पोहचण्याची संधी पाहून भाजप, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनीही प्रचारात हिरारीने सहभाग घेतला. त्यानंतरही चिंचवडमधील काही प्रभागात जास्त तर काही प्रभागात कमी मतदान झाले आहे. मात्र, प्रभागात आपल्याच
पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत-जास्त मतदान होण्यासाठी काही माजी नगरसेवकांनी प्रयत्न केले. तर काहींनी छुप्या पध्दतीने विरोधी उमेदवाराचे काम केले असल्याची राजकीय वतुर्ळात कुजबूज सुरू आहे. असे असले तरी प्रभागात ज्या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान असेल त्या पक्षाच्या माजी नगरसेवकाला आगामी पालिका निवडणुकीचे तिकीट मिळण्यास अडचण येणार नाही. मात्र, कमी मतदान पडलेल्या माजी नगरसेवकाला मात्र तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. चिंचवडमधील 13 प्रभागात काही ठिकाणी भाजपची तर काही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या बालेकिल्यात कमी अधिक प्रमाणात मतदान झाले आहे. प्रभाग क्र. 17 चिंचवडेनगर, चिंचवडगाव, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, वाल्हेकरवाडीमध्ये सर्वाधिक म्हणजे 28 हजार 484, प्रभाग क्र. 27 तापकीरनगर, रहाटणी, श्रीनगर, काळेवाडीत 28 हजार 370, प्रभाग क्र. 16 रावेत, किवळे, मामुर्डीत 26 हजार 37, प्रभाग क्र. 26 पिंपळे निलख, वाकड, वेणूनगर, कस्पटेवस्ती, विशालनगरमध्ये 25 हजार 79, प्रभाग क्र.29 पिंपळे गुरव, सुदर्शनगरमध्ये 23 हजार 361 मतदान झाले आहे.