मुंबई: महाराष्ट्रातील ‘अ, ब, क’ वर्ग महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने आज ( १० जून) रोजी जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे २०२५ च्या आदेशानुसार, पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. यामुळे पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर या महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान झाली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अंतर्गत, प्रत्येक प्रभागातून शक्यतो चार, किमान तीन आणि कमाल पाच सदस्य निवडले जातील, अशी तरतूद २०२४ च्या अधिनियमानुसार आहे. प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे होईल. सरासरी लोकसंख्या ठरविण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले प्रभागातील सदस्य संख्या हे सूत्र वापरले जाईल. प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या १० टक्के कमी-जास्त असू शकते; अपवादात्मक कारणांसह यापेक्षा जास्त फरक असल्यास स्पष्टीकरण आवश्यक आहे. प्रभाग रचना उत्तरेकडून सुरू होऊन दक्षिणेकडे पूर्ण होईल, भौगोलिक सलगता राखली जाईल. रस्ते, नद्या, रेल्वे मार्ग यांसारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या जातील. कोणत्याही इमारतीचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही. महानगरपालिका आयुक्त प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करतील आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करतील. यानंतर हरकती-सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर होईल. प्रभागांचे नकाशे गुगल अर्थवर तयार होऊन, प्रगणक गट, लोकसंख्या आणि सीमा स्पष्ट दर्शविल्या जातील. ही प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य राहावी, यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश आहेत. गोपनीयता भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल. निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.