लडाख – भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल भागात झालेल्या युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाचा 24 वा दिन आज साजरा करण्यात आला. यानिमीत्त संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास येथे जाऊन तेथील शहीदांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण केली तर नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनीही शूरवीरांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला. कारगिलची लढाई भारतीय सैनिकांसाठी अत्यंत जिकीरीची होती. पाकिस्तानी सैनिक डोंगर माथ्यावरून भारतीय लष्करावर हल्ला करीत असताना दुर्गम डोंगराळ भाग चढून जाऊन तेथील सैनिकांशी मुकाबला करणे हे खरेच एक आव्हानात्मक काम होते. दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षात, कारगिलमधील काही खास ठिकाणांवर कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोरांना मागे ढकलण्यात लष्कराला यश आले आणि त्यांनी शत्रूच्या ताब्यातून घेतलेल्या भूभागावर तिरंगा फडकवला. कारगिल जिल्ह्यातील द्रास, कारगिल आणि बटालिक सेक्टरमध्ये आघाडीवर संघर्ष झाला. यावेळी शहीद झालेल्या जवानांची शौर्यगाथा लष्कराने दृकश्राव्य माध्यमातून तयार केली आहे.