पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटरमध्ये डॅशबोर्ड
मोबाइल ऍपचा वापर, हेल्पलाईनही सुरू
पुणे – करोना विषाणूच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) कोविड-19 विरूद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी एक नवा डिजिटल डॅशबोर्ड विकसित केला आहे. तसेच, पुणे स्मार्ट सिटीच्या हाय-टेक कमांड अँड कंट्रोल सेंटरला वॉर रूमचे स्वरुप प्राप्त झाले आहे. करोना व्हायरस संबंधीच्या कार्यवाहीचे निरीक्षण, नियंत्रण व समन्वय करण्यासाठी या कमांड सेंटरचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
या सेंटरला महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, शंतनू गोयल यांनी भेट देऊन आढावा घेतला. तसेच, आरोग्य विभागप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख राहुल जगताप यांनीही याची पाहणी केली. या वॉररूम मध्ये एकात्मिक डॅशबोर्ड तयार केला असून, त्याद्वारे शासकीय विलगीकरण केंद्रांची अद्ययावत माहिती, संशयित रुग्णांची आरोग्यविषयक माहिती आणि घरात विलगीकरण केलेल्या लोकांचा व त्यांच्या संपर्कांत आलेल्यांचा मागोवा घेण्यात येत आहे.
यासंदर्भात नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या असून, त्या माध्यमातून महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नागरिकांना साह्य करत आहे. या व्यतिरिक्त पुणे स्मार्ट सिटीने जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर करून करोना बाधित व संशयित अशा प्रत्येक रुग्णांचे मॅपिंग केले आहे. नायडू रुग्णालयात आरोग्य सेवांचा आढावा घेतला जात आहे. तसेच हीट मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे.