वॉन्टेड दहशतवादी तरसेम सिंगला केले भारताच्या हवाली

नवी दिल्ली : वॉन्टेड दहशतवादी तरसेम सिंग भारताच्या ताब्यात आला. त्याचे अबूधाबीमधून प्रत्यार्पण करण्यात आले. सीबीआय, एनआयए आणि इंटरपोलमधील समन्वयामुळे ते शक्य झाले. पंजाब पोलिसांच्या कार्यालयावर मे २०२२ मध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याप्रकरणी सिंग तपास आणि सुरक्षा यंत्रणांना हवा होता. तो बब्बर खलिस्तान इंटरनॅशनल (बीकेआय) या संघटनेचा सदस्य आहे.
भारतीय यंत्रणांच्या पाठपुराव्यानंतर इंटरपोलने सिंग याच्याविरोधात रेड नोटीस बजावली. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याला अबूधाबीत पकडण्यात आले. तिथून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. एनआयएने त्याच्या विरोधात याआधीच गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर अवैध कारवायांसाठी भारतातील साथीदारांना पैसा पुरवल्याचा आरोप आहे.
बीकेआय आणि इतर संघटना शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके, अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्याचा संशय आहे. त्या अवैध कारवायांसाठी तस्करी, खंडणी, हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पैसा उभा केला जात होता. आता सिंग याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.





