Pune : तासगावातील वाँटेड पुण्यात जेरबंद

पुणे : सहकारनगर वाहतूक विभागाचे पथक ट्रिपल सीट व राँग साइड कारवाई करत असताना एक ट्रिपल सीट गाडीवरील व्यक्ती पळून जात असताना त्यांना आढळली. त्यांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता तो एका खुनाच्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी निघाला. तो तासगाव येथे खून करून पुण्यात पळून आला होता.
यासंदर्भात सविस्तर असे, की सहकारनगर वाहतूक विभागामधील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर बिबवेवाडी पोलीस ठाण्यासमोर पोलीस अंमलदार स्वनिल कदम व सागर शिंदे यांच्यासोबत ट्रिपल सीट व राँग साइडने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करत होते. तेव्हा एक ट्रिपल सीट गाडीवरील मागे बसलेली व्यक्ती त्यांना बघून पळून जात असताना दिसली. त्यांनी त्याला थांबवले असता, त्याने त्याचे नाव गणेश मळेकर (रा. सांगली) असल्याचे सांगितले. त्याच्या पायाला जखम झालेली होती, यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला तू पळून का जात आहेस व पायाला काय लागले आहे? असे विचारले.
तेव्हा त्याने सांगितले की माझी तासगाव (जि. सांगली) येथे भांडणे झाली होती. भांडणांमध्ये मी रोहित फाळके याचा खून केला आहे. तेव्हा झटापटीत पायाला जखम झाली. पुण्यात पळून आल्यावर येथे एका दुचाकीस्वारास लिफ्ट मागितली. मात्र, पोलीस बघितल्यावर भीती वाटल्याने पळ काढत होतो. दरम्यान, पोलिसांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर मेसेज वायरल झालेला होता.
त्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध तासगावचे तपास पथक घेत असल्याची माहिती होती. वाहतूक पोलिसांनी संपर्क साधला असता, योगायोगाने पथक बिबवेवाडी भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी गणेश मळेकर यास पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाच्या ताब्यात सोपविण्यात आले.





