बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई केली. मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई केली जावी. तसेच 302 च्या गुन्ह्यात आरोपी करावे, या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थांकडून उद्या, सोमवारी आंदोलन केले जाणार आहे.
संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे उद्या आंदोलन करणार आहेत. वाल्मीक कराड यांच्यावर अद्याप मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही त्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
धनंजय देशमुख म्हणाले, वाल्मीक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली नाही. 302 मध्ये आरोपी केले पाहिजे. माझ्या कुटुंबाला माहिती दिली जात नाही. आम्हाला दूर ठेवले जात आहे. मी स्वतः टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेणार आहे.
मला या सगळ्यापासून भीती आहे. खंडणीतल्या आरोपीला वेगळी आणि खुनाच्या प्रकरणातील आरोपींवर वेगळी कारवाई केली जात आहे. यंत्रणा आम्हाला माहिती देत नाही, मुख्यमंत्र्याला भेटून मी मागणी केली होती. पण तरी यंत्रणा आम्हाला तपासाची माहिती देत नाही.