वाल्मिक कराडला न्यायालयात नेताना पोलिसांच्या ताफ्यात शिरल्या ४ अनोळखी कार ; या कार नेमक्या कोणाच्या?, ताफ्यात अचानक कुठून आल्या?

Walmik Karad । बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याला बीड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वाल्मिक कराड याला मकोका लागल्यापासून परळी, केज परिसरात कराडच्या समर्थकांकडून आक्रमकपणे निदर्शने केली जात आहेत. दरम्यान,वाल्मिक कराडला काल न्यायालयात घेऊन जाताना एक आश्चर्यकारक घटना घडली त्या घटनेची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.
चार अनोळखी वाहने ताफ्यात घुसल्याने संशय Walmik Karad ।
वाल्मिक कराड याला बुधवारी केज न्यायालयात हजर केले जाणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला केजऐवजी बीड न्यायालयात सादर करण्यास परवानगी मिळावी, यासाठी सीआयडीने न्यायालयात अर्ज केला होता. ही विनंती न्यायालयाने मान्य केली होती. मात्र, वाल्मिक कराड याला केजवरुन बीडकडे आणत असताना अचानक त्यांच्या ताफ्यात चार अनोळखी वाहने घुसली. आजुबाजूला पोलिसांच्या इतक्या गाड्या असतानाही चार अनोळखी वाहने ताफ्यात घुसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. चार गाड्या पोलिसांच्या ताफ्यात कशा शिरल्या, याबद्दल सवाल निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे या चार गाड्या पोलिसांच्या ताफ्यात घुसल्या त्यानंतर या गाड्यांचा तपास केला तेंव्हा त्यात काहीच न आढळून आल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. परंतु, आता पोलिसांकडून या वाहनांचा शोध सुरु असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.
बीड सत्र न्यायालयाबाहेर कराड समर्थक-विरोधकात राडा Walmik Karad ।
दरम्यान, वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईनंतर बीडच्या काही भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत बुधवारी पांगरी गावात आक्रमक निदर्शने झाली. तर परळी शहरातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही दहशतीमुळे दुकाने उघडली नव्हती. तर धर्मापुरी आणि शिरसाळा येथेही शांततेत बंद पाळण्यात आला. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेले जात असताना बीड सत्र न्यायालयाबाहेर राडा झाला. न्यायालयाबाहेर वाल्मिक कराड समर्थक आणि विरोधी असे दोन गट जमले होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.





