प्रभात वृत्तसेवा वाई – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. स्थानिक प्रमुखांनी उमेदवार ठरवले तरी ते मान्य असतील, मात्र तिन्हीही जागा मोठ्या फरकाने जिंकल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. यशवंतनगर जिल्हा परिषद, पसरणी व अभेपुरी गणातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व्याहळी काॅलनी येथे झाला. अध्यक्षस्थानी मदत व पूर्नवसन मंत्री ना. मकरंद पाटील हाेते. यावेळी प्रतापराव पवार, प्रमाेद शिंदे, विजयसिंह नायकवडी, रमेश गायकवाड, सत्यजित वीर, महादेव मस्कर, शशिकांत पवार, बाळासाहेब चिरगुटे, विक्रांत भैय्यासाहेब डाेंगरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. आपल्या आमदारकीच्या काळातील विकासकामांचा आढावा घेताना ना. पाटील म्हणाले, ‘‘नागेवाडी कॅनॉल, जललक्ष्मी योजना, कवठे केंद्र योजना, देवघर–बलकवडी सिंचन योजना यामुळे दुष्काळी भागात पाणी पोहोचले. खंडाळा तालुक्यातील २७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून पिढ्यानपिढ्या दुष्काळग्रस्त असलेला तालुका सुजलाम-सुफलाम करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे.’’ वाई- महाबळेश्वर, भोर- मांढरदेव, वाई- जोर, वाडकरवाडी- पांगरी आदी रस्त्यांसाठी कोट्यवधींचे प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठ्यासाठी नवीन उपकेंद्रे मंजूर करण्यात आली असून, लवकरच पश्चिम भागातील वीजप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पर्यटन विकासाच्या दृष्टीने थीम पार्क, जंगल सफारी, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरूअसून तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात केलेली मदत, अतिवृष्टीतील पुनर्बांधणी, आरोग्य सुविधा व पूल- रस्ते पुलर्निर्मितीची उदाहरणे त्यांनी दिली.विधानसभेत वाईकरांनी नेहमीच मोठे मताधिक्य दिले असून, पाचगणी व महाबळेश्वर नगरपालिकांमध्ये पक्षाला यश मिळाले आहे. पक्ष ज्या उमेदवाराला संधी देईल, त्याला सर्वांनी एकदिलाने साथ द्यावी, आगामी निवडणुकांत पक्षाच्या चिन्हावर तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विक्रांत भैय्यासाहेब डाेंगरे, विजयसिंह नायकवडी, साै. मेघा सचिन सावंत, गेणूबा चाैधरी, कृष्णदेव वाडकर, दिलीप वाडकर, विजय यवले यांनी मनाेगत व्यक्त केले. पसरणी गावातील युवकांच्यावतीने मंत्री आ. मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बाळासाहेब चिरगुटे, भैय्यासाहेब डाेंगरे, बाबूनाना महांगडे, संपत महांगडे, विक्रात डाेंगरे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचलन केले.