प्रभात वृत्तसेवा भुईंज – वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत वाईकरांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून निवडणुकीत भाजपा पक्षाला नगराध्यक्ष व दहा नगरसेवक दिल्याने वाई शहराचा विकास थांबणार नसून वाईकरांनी टाकलेला विश्वासात पात्र राहून वाईचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले यांनी दिली. वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, माजी आमदार व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा भोसले यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर पॅनल उभे केले. वाईकरांनी पक्षावर आमच्या नेत्यांच्यावर दाखवलेला प्रचंड विश्वासामुळे आमचे नगराध्यक्ष आणि दहा नगरसेवक दणदणीत विजयने निवडून आले. हा विजय म्हणजे केवळ निवडणूक जिंकण्याचा नाही तर वाईच्या विकासाला मिळालेली लोकमान्यता आहे.या ऐतिहासिक यशासाठी वाई शहरातील प्रत्येक मतदार प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक समर्थकांचे मी मनापासून आभार मानते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल भाऊ सावंत सर्व नगरसेवक आणि आम्ही सर्वजण मदनदादांच्या नेतृत्वाखाली वाईला सुंदर आकर्षक आणि आदर्श शहर बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. हा विजय संपूर्ण टीमचा भाजपचे दोन्ही मंत्री ना. जयकुमार गोरे, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाईसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे जात आहोत. या विजयासाठी सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मेहनत घेतली. हा विजय संपूर्ण टीमचा परिणाम असल्याचे सांगितले. पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या लढतीचा आम्ही सन्मान करतो. वाईकरांनी दिलेला हक्क आम्ही शब्दाने नाही तर कामातून सिद्ध करू, अशी ग्वाही डॉ. सुरभी भोसले यांनी दिली.