वाघोली – कचरा वेचणारी महिला पायी चालत जात असताना पाण्याच्या टँकरने महिलेला धडक दिल्याने महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली येथील केसनंद फाटा येथे शनिवारी (दि. २२) सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. राधिका कृष्णा सोनवणे (वय ५२, रा. येरवडा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चालक अजय ज्ञानेश्वर धोत्रे (रा. वाघोली) व मालक गणेश तांबे (रा. भावडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे या पायी जात असताना नगर रोडवर केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होम समोर पाण्याच्या टँकरने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोनवणे यांना मृत घोषित करण्यात आले. चालक धोत्रे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालवून अपघात केल्याने धोत्रे याच्यावर तसेच वाहन परवाना नसताना तसेच वाहनाचा विमा नूतनीकरण नसताना चालकाला वाहन चालविण्यासाठी प्रोत्साहान दिल्याने मालक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शरद भाकरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास वाघोली पोलीस करीत आहेत.