Wagholi News : वाघोली गावासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी पीएमआरडीए ची वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आली असून या योजनेचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. या योजनेमुळे वाघोली परिसरातील नागरिकांना दररोज सुमारे ५० लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या वाघोली परिसरातील अनेक नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र ही योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकत पाण्यावरील अवलंबित्व कमी होणार असून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणार आहे. तसेच सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा मेंटेनन्स खर्चही कमी होण्यास मदत होणार आहे. या योजनेला स्व. आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रयत्नातून २०१९ साली सुमारे २३ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती आणि त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे मागील सात वर्षांपासून या पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले होते. दरम्यान, नगरसेविका रत्नमाला संदिप सातव आणि भाजप जिल्हा सरचिटणीस संदिप आबा सातव यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत संबंधित अधिकारी, जागामालक आणि ठेकेदार यांच्यासोबत समन्वय साधत विविध अडचणी दूर केल्या. तसेच वेळोवेळी कामाची पाहणी करून काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे अखेर ही योजना पूर्णत्वास आली असून वाघोलीला पाणीदार करणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते येत्या 22 मार्च 2026 होणार आहे. “सध्या वाघोली परिसरातील अनेक नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पीएमआरडीए च्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे होते. सातत्याने पाठपुरावा करून आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत हे काम मार्गी लावण्यात आले आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर वाघोलीतील नागरिकांना नियमित पाणी मिळेल, सोसायटींचा मेंटेनन्स खर्चही कमी होईल. भविष्यातही ड्रेनेज, पाणी, वीज आणि रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी काम करत राहणार आहोत.” -रत्नमाला संदीप सातव, नगरसेविका, पुणे मनपा