Wagholi: वाघोली (तालुका हवेली) येथील वाघोली -भावडी रस्ता अवजड वाहतुकीमुळे अक्षरशः चाळण बनला असून या रस्त्याला तातडीने निधी उपलब्ध होऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाघोली -भावडी रस्ता हा वाघोली मधील वाहतूक कोंडी दूर करणारा पर्यायी मार्ग म्हणून नावारूपास आला होता. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट, आमदार बाबुराव पाचरणे यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी पीएमआरडीच्या माध्यमातून भरीव निधीतून रस्त्याचे काम झाले होते. मात्र आता हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे खड्डेमय आणि चाळण बनला आहे. या रस्त्यावरून जाणे येणे सर्वसामान्य नागरिकांसाठी तारेवरची कसरत बनली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव यांनी या रस्त्याला पुणे मनपाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मिळावा व या रस्त्याचे काम व्हावे यासाठीची मागणी वारंवार केली आहे. हेही वाचा – Pune: खानवडी शाळा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे निलंबित पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल सातव यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून नागरिकांकडून या पाठपुराव्याचे स्वागत होत आहे. मात्र नागरिकांची गैरसोय अवजड वाहतुकीमुळे दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अवजड वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी उपाय योजनांची गरज… वाघोली -भावडी रस्त्याने अवजड वाहतुकीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या अगोदर अनेक डंपर मालक वाहने मधल्या रस्त्याने जात येत असल्याने वाघोली भावडी रस्त्यालगत असणाऱ्या नागरिकांच्या पर्याय रस्त्यांची देखील चाळण लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांकडून मर्यादित वेळेच्या अगोदर अवजड वाहतुकीला बंदी असताना वाहने ये जा करत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वाघोली वाहतूक शाखेकडून कोणतीही योग्य ती उपाय योजना केली जात नाही. आर्थिक तडजोडीतून ही वाहने नगर रस्त्यावर सोडली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसात दुसऱ्या रस्त्यांची देखील चाळण होऊ शकते. “वाघोली भावडी रस्त्याच्या निधीसाठी ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा केल्यामुळे निधी मिळाला होता. मात्र अवजड वाहतुकीच्या मुळे या रस्त्याची चाळण होऊ लागली आहे. पुणे महानगरपालिकेने तातडीने याबाबत निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्त करून द्यावा. वाघोली वाहतूक वाहतूक शाखेने मर्यादित वेळेत वाहने पुणे नगर रस्त्यावर ये जा करण्यासाठी करण्यासाठी बंधने घालावी.” – राजेंद्र सातव पाटील,( अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान वाघोली)