Wagholi: पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट वाघोली परिसरातील ‘लेक्सिकॉन स्कूल ते म्हसोबा मंदिर ते केसनंद रोड’ या रस्त्याच्या विकासासाठी अतिरिक्त ८.१७ कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उपलब्ध निधी अपुरा पडत असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७२ (ब) नुसार स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. या रस्त्याच्या कामासाठी सध्या सुमारे १.७० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. मात्र, तज्ञ सल्लागारांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) या १८ मीटर रुंदीच्या आर.पी. रस्त्यासाठी एकूण सुमारे ९.६७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे उर्वरित ८.१७ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. यासाठी नगरसेविका रत्नमाला सातव यांनी मागणी केली होती. नगररोडलगत असलेला हा रस्ता आय.व्ही. इस्टेटकडे जाणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. प्रत्यक्ष पाहणीत या मार्गावर काही ठिकाणी दलदलयुक्त जमीन, पाणी साचलेले भाग तसेच रस्त्याच्या पातळीत ४ ते ५ मीटरपर्यंत फरक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कामासाठी विशेष तांत्रिक उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी मे. इंफ्राकिंग कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि. या तज्ञ सल्लागार संस्थेकडून डीपीआर तयार करण्यात आला असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम केल्यास प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे मत पथ विभागाने नोंदवले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास नगररोड ते आय.व्ही. इस्टेटदरम्यानची ‘मिसिंग लिंक’ पूर्ण होऊन परिसरातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा मानला जात आहे. “उपलब्ध १.७० कोटी रुपयांच्या तरतुदीच्या आधारे एकूण ९.६७ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. अंतिम मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार आहे.” – रामभाऊ दाभाडे (नगरसेवक, पुणे मनपा)