वाघोली: फुलगाव ते गुरुकुल शाळेपर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचा सावळा गोंधळ उघड

वाघोली- फुलगाव ते गुरुकुल शाळा, तालुका हवेली येथील रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत वाघोली येथील स्वप्नील मगर यांनी पालकमंत्री अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग, दक्षिण) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर उपअभियंता (बांधकाम विभाग, हवेली) यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, रस्त्याच्या कामाची गुणवत्ता राज्य गुणवत्ता नियंत्रक यांच्यामार्फत तपासण्यात आली.
तपासणीत आढळलेल्या त्रुटी ठेकेदाराने दुरुस्त केल्याने ही तक्रार निकाली काढण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी ८ जुलै २०२५ रोजी स्वप्नील मगर यांना पत्राद्वारे कळवले. मात्र, याच दरम्यान शाखा अभियंता शालिनी कोकाटे यांनी मगर यांना ९ जुलै रोजी कामाच्या तपासणीसाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचा संदेश पाठवला होता, ज्यामुळे प्रशासकीय गोंधळ उघड झाला आहे.
प्रशासकीय त्रुटी आणि आरोप –
स्वप्नील मगर यांनी १९ मे २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत शाखा अभियंता शालिनी कोकाटे, उपअभियंता संजय गीते आणि कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी न केल्याचा गंभीर आरोप केला होता. कागदपत्रांनुसार, हे काम ३० ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाले असले तरी डांबरीकरणाचे दाखले ११ आणि १४ नोव्हेंबर २०२४ चे आहेत. तसेच, २२ एप्रिल २०२५ रोजी तपासणी अधिकारी एस. बी. पवार यांनी चाळणी पृथक्करण न करता आणि जिओ-टॅग फोटोंशिवाय तपासणी केली. कामाचे सर्व स्तर (लेयर्स) पूर्ण नसताना आणि आवश्यक फोटो पुरावे नसताना ठेकेदाराला देयक अदा करण्यात आल्याचा आरोप मगर यांनी केला आहे.
प्रक्रियेत गोंधळ –
तक्रारीनुसार, शाखा अभियंता कोकाटे यांनी प्रथम मापे नोंदवली, त्यानंतर उपअभियंता गीते यांनी १००% तपासणी केली आणि कार्यकारी अभियंता पाथरवट यांनी ५% तपासणीनंतर बिल मंजूर केले. मात्र, याच कामात तपासणी अधिकारी पवार यांनी त्रुटी आढळल्याचा अहवाल दिला, ज्यामुळे प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीच शाखा अभियंता कोकाटे यांनी ठेकेदाराकडून त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असे आश्वासन दिले होते. तरीही बिल मंजुरीची घाई का झाली, असा सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांची मागणी –
स्वप्नील मगर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची आणि त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, तक्रार निकाली काढण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप होते, त्यांच्याच हातात चौकशी सोपवण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे.
नागरिकांमध्ये संताप –
फुलगाव ते गुरुकुल शाळा रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकरणात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.





