वाघोली : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वाघोली येथील संपत गाडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अर्धा किलोहून अधिक वजनाची आकर्षक चांदीची राखी अर्पण केली. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर माऊलींना सर्वस्व मानले जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडे कुटुंबीयांनी सलग तीन वर्षे सोन्याची राखी अर्पण केली होती, तर यंदा माऊलींच्या स्वर्ण कलशासाठी सोने दान करत चांदीच्या राखीने रक्षाबंधन साजरे केले. या प्रसंगी गाडे कुटुंबीयांनी यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळावे आणि त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी केली. या अनोख्या उपक्रमाने गाडे कुटुंबीयांनी आपली भक्ती आणि सामाजिक बांधिलकी दर्शवली असून, त्यांच्या या कार्याचे वारकरी मंडळी आणि स्थानिक नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.